Saturday 5 December 2015

रांगणागड - नारूर, कुडाळ

रांगणागड ( कुडाळ ) - सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माणगाव खोऱ्यातील रांगणागड हा आहे.
कुडाळ तालुक्यातील नारूर मुक्कामाहून रांगणागडावर जायला पायवाट आहे. भयाण जंगल, दगडधोंडय़ांतील पायवाट, जंगली पशूंचा वावर या संकटांवर मात करत रांगणागड गाठावा लागतो. वाटेत जर लक्ष चुकून तुमचा पाय घसरल्यास १०० ते १५० फूट तुम्ही खालीच गेला समजा.

पहाण्याची ठिकाणे :
या गडावर जायचं म्हणजे दांडगी इच्छाशक्तीच हवी. तब्बल २ तासांनंतर गडावर पोहोचता येते. गडाची तटबंदी पूर्णपणे ढासळलेली आहे. जुना दिंडी दरवाजादेखील अर्धवट उभा आहे. दिंडी दरवाजातून आतमध्ये गेल्यावर उजव्या बाजूला पाण्याची विहीर लागते. पुढे गेल्यावर बुरुजाचे संरक्षण देऊन लपविलेला गडाचा दुसरा दरवाजा लागतो. याच्या आत पहारेकर्‍यांच्या देवडया आहेत थोडंसं पुढे चालत गेल्यावर दुसरा एक दरवाजा लागतो. या दरवाजाचं नक्षीकाम फारच सुंदर आहे. या दरवाज्याच्या उजव्या अंगाने जाणार्‍या पायवाटेने गेल्यावर एक कोरडा तलाव लागतो. येथून पुढे जांभ्या दगडात बांधलेली जोती दिसतात. गडाच्या या भागात दोन्ही बाजूने भक्कम तट असून त्यावर चढण्यासाठी जिने आहेत. शेवटी भव्य बुरुजात एक हनुमंताचे शिल्प कोरलेला चोर दरवाजा आहे. परंतु तो दगडांनी चिणलेला आहे. येथून पुन्हा माघारी दुसर्‍या दरवाज्याजवळ यायचे. समोरच उजव्या हातास वाडयाची चौकट दिसते. चौकटीतून आत गेल्यावर विहिर लागते. वाडयाच्या भिंतीजवळ फारसी शिलालेख आहे. वाडा पाहून पुढे गेल्यावर समोरच गडाचा तिसरा भक्कम दरवाजा लागतो. त्याला चार कमानी आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर सरळ पायवाटेने पुढे गेल्यास मोठा तलाव पाहायला मिळतो. या तलावात वर्षांचे बाराही महिने मुबलक पाणी असते. तलावाच्या दुसर्‍या बाजूस अनेक समाध्या दिसतात. तलावाच्याच काठावर पश्चिमेला भग्नावस्थेतील शिवमंदिर दिसते. यानंतर ओढा पार करुन आपण रांगणाई मंदिराजवळ येतो. मंदिराच्या समोरील नक्षीदार दीपमाळ लक्ष वेधून घेते. या दीपमाळेचे बांधकाम काळ्या दगडाचे आहे. या मंदिराच्या बाजूला हनुमान मंदिरदेखील आहे. संपूर्ण गडावर फिरताना या गडाच्या चारही बाजूला पाहिल्यास नजरेत मावणार नाही एवढा दूरवरचा प्रदेश दिसतो.
रांगणाई देवीचे मंदिर प्रशस्त असून, मुक्कामास योग्य आहे. मंदिरात रांगणाई देवीची ढाल, तलवार, त्रिशूळ इत्यादी आयुधे घेतलेली मुर्ती आहे. रांगणाईच्या उजव्या हाताला विष्णूची मुर्ती व डाव्या हाताला भैरवाची मुर्ती आहे. या ठिकाणी एक फारसी शिलालेखाचा दगड आहे. मंदिरासमोरच दिपमाळ आहे. रांगणाई मंदिराच्या उजव्या बाजूला मारुतीचे मंदिर आहे. जवळच कोरडी विहिर आहे.
यापुढे दाट जंगल असल्याने आपण पुन्हा तिसर्‍या दरवाज्यापर्यंत माघारी यायचे. तलावाकडे तोंड उभे राहिल्यास डाव्या हाताने जाणार्‍या पायवाटेने चालू लागायचे. वाटेत छोटेसे गणेशमंदिर लागते. तटबंदीच्या बाजूने चालू लागल्यावर एक तलाव लागतो. या तलावाच्या काठावर देवळीमध्ये शिवलिंग आहे. पिंडीस दोन लिंगे आहेत. हे पाहून तटाच्या बाजून पुढे चालू लागल्यावर काही पायर्‍या उतरल्यावर एक दरवाजा लागतो. या दरवाजाच्या डाव्या बाजूस तटबंदीमध्ये गोल तोंडाची विहिर आहे. पुढे चालून गेल्यावर आपण गडाच्या हत्तीसोंड माचीवर पोहोचतो. ही संपूर्ण माची राजगडाच्या संजिवनी माचीप्रमाणे तटबंदीने संरक्षित केलेली आहे. तटबंदीला पायर्‍याही आहेत. तटाच्या उजव्या हाताच्या उतारावर चिलखती बुरुज आहे. हा बुरुज पाहून आपण वर यायचे व सोंडेच्या टोकावर असलेल्या चोर दरवाज्यात उतरायचे. माथ्यावर बारा कमानी असलेला दगडात खोदून काढलेला हा दरवाजा आहे. या दरवाज्यातून उतरण्यासाठी पायर्‍या असून त्या उतरल्यावर आपण दरीच्या तोंडावर येतो, तेव्हा सावधपणा बाळगावा. तटाकडेने पुढे चालत राहिल्यावर आपणास आणखी एक भव्य दरवाजा लागतो. या दरवाज्यातून उतरणारी वाट केरवडे गावात जाते. हा दरवाजा गोमुखी बांधणीचा आहे.
तटाकडेने पुढे चालत राहिल्यावर आपण पश्चिमेकडील कोकण दरवाजाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. या दरवाज्यावर गोल बुरुज आहे. या दरवाज्यातून उतरणारी वाट नारुर गावास जाते. कोकण दरवाजा रांगणाई देवी मंदिराच्या बरोबर मागे असल्याने आपण पायवाटेने १५ मिनिटात मंदिरात येऊन पोहोचतो.

इतिहास :
हा गड शिलाहार घराण्यातील दुसरा भोज राजाने उभारला आहे. इ. स. ११७५ ते १२१२ हा या राजाचा कालावधी आहे. यावरून हा गड ८०० वर्षे जुना असल्याचे समजते. येथे शिलाहारांची पन्हाळा ही राजधानी होती. राजा दुसरा भोजने आपल्या कारकीर्दीत १५ किल्ले उभारले .१४७० मध्ये तो महंमद गवानने जिंकला. त्यावेळी महंमद गवानने काढलेले उद्गार होते, ‘अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला. त्यात मर्दमुकीबरोबर संपत्तीही खर्च करावी लागली’.
बहामनी साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा किल्ला अदिलशाहीत आला. शिवकाळात अदिलशाही सरदार सावंतवाडीचे सावंतांकडे हा गड होता. सन १६५८ मध्ये विजापूरचा सरदार रुस्तम जमानने हा गड सावंताकडून घेतला. प्रतापगडावर १० नोव्हेंबर, १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. यानंतर १८ दिवसांनी म्हणजे २८ नोव्हेंबर १६५९ रोजी महाराजांनी पन्हाळा जिंकून घेतला. पुढे पावणगड, वसंतगड व विशालगडाबरोबरच रांगणागडही जिंकून घेतला. पुढे अदिलशहाने रांगण्याविरुध्द मोहिम उघडली. त्यावेळी छत्रपती आग्य्राला कैदेत होते. स्वराज्याच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. अशा बिकट प्रसंगी स्वत:… जिजाबाईंनी खास मोहिम काढून दि १५/०८/१६६६ रोजी रांगणा जिंकला. ही एक अद्‌भूत घटना रांगण्याचे स्वराज्यातील महत्व अधोरेखीत करते. दि १७/०८/ १६६६ रोजी महाराजांनी आग्य्राच्या कैदेतून पलायन केले. १४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी ६००० होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो.. १६९५ मध्ये रांगणागडावर राजाराम महाराजांना राज्याभिषेक करण्यात आला होता.
औरंगजेबाला दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला नाही. वारणेच्या तहानुसार रांगण्याचा ताबा करवीरकर छत्रपतींकडे आला. शाहू - ताराबाई संघर्षात पन्हाळयावरुन निघून ताराबाई या गडावर वास्तव्यास आल्या होत्या. सन १७०८ मध्ये सातारकरांनी गड
........त्यावेळी ताराबाईला सिंधुदुर्गावर पाठवून रामचंद्र पंत अमात्यानी व पिराजी घोरपडे यांनी किल्ला ३ महिने लढविला. पावसाळा सुरु झाल्यामुळे छत्रपती शाहूनी वेढा आटोपता घेतला.
सावंतवाडीकरांवर कायम दबाव ठेवण्यासाठी करवीरकराच्या दृष्टीने रांगण्याला विशेष महत्व होते. सावंतवाडीकरांच्या वतीने जिव्हाजी विश्राम यांनी फितुरीने रांगणा हस्तगत केला होता. परंतु करवीरकरांचा निधडया छातीचा वीर सुभान यशवंतराव शिंदे यांनी अडीच महिने झुंज देऊन गड हस्तगत केला. करवीरकरांचे महास्थल म्हणून या गडाचा उल्लेख त्यावेळच्या कागदपत्रात वारंवार येतो. पुढे सावंतवाडीकरांनी करवीरकरांशी एकनिष्ठ राहाण्याचे ठरविले व रांगणाडावर इंग्रजाचे राज्य येई पर्यंत करवीरकरांकडे राहिला. ९ डिसेंबर, १८४४ साली हा गड इंग्रजांनी ताब्यात घेतला. अत्याधुनिक तोफांच्या माऱ्यात गडावरील इमारती व तटबंदीचे मोठे नुकसान झाले. कोल्हापूरच्या पन्हाळगडापासून हा किल्ला ५० मैलांवर आहे, तर समुद्र सपाटीपासूनची याची उंची ३००० फूट आहे.

No comments:

Post a Comment