श्रीमंत बनवणारी स्वच्छता
संसदेच्या हाऊसकीपिंगचं काम मिळालं आणि त्यानंतर ‘बीव्हीजी’चं नाव पसरतच गेलं. पुढच्याच वर्षी लोकसभा, राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं मिळाली. पुढं पंतप्रधानांचं निवास. तिथं बागेतला धूळ बसून काळा झालेला रस्ता पहिल्यासारखा स्वच्छ लालभडक केला आणि त्याने किमया केली. मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय.. आज ‘बीव्हीजी’च्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे ६० हजार. अगदी तिसरी उत्तीर्णपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत! विस्तार वेगाने वाढतोय. भारतीय रेल्वे, टाटा समूह, फोक्सवॅगन, हिंदुस्थान लिव्हर, ओएनजीसी, आयटीसी.. कितीतरी. देशभर २० राज्यांमध्ये चारशेपेक्षा जास्त कंपन्या, संस्था आहेत.. कोणतंही मोठं नाव घ्या. आम्ही तिथं आहोतच.’’
माझ्या सभोवताली पशावर
निजलेले उडय़ा मारणारे
गगनचुंबीत राहणारे
कोटय़धीश-अब्जाधीश
मीही माझ्या ध्रुवावर
सर्वापेक्षा उंचावर
जाण्यासाठी तप करणारा
जेथून कोणीच मला
पशात तोलू शकणार नाही
भले मी निष्कांचन राहीन
पण ध्रुवावर जरूर जाईन!
हो. मी ध्रुवावर जायचं पक्कं केलं होतं. कसं? कधी? माहीत नव्हतं. खिशात पसा नव्हता, मार्गही माहीत नव्हता, पण जायचं होतं, हे निश्चित! त्यावेळची ही माझी कविता.
मी पुण्यात बिबवेवाडीतल्या व्हीआयटी कॉलेजात होतो. इंजिनीअिरगचे शिक्षण घेत होतो. वसतिगृहात राहायचो. त्याआधी फुगेवाडी ते बिबवेवाडी हे रोजचं ४२ किलोमीटरचं अंतर सायकलवरून कापायचो. वेळ खूप जात होता. म्हणून वसतिगृहात राहायचं ठरवलं. पण महिन्याचं ३०० रुपयांचं भाडं देण्याची ऐपत नव्हती. प्राचार्य खाडिलकर सरांना भेटलो. त्यांनी २५ रुपयांमध्ये राहायची परवानगी दिली. माझी इलेक्ट्रिकची शेगडी होती. तिच्यावर भात शिजवायचो. खालून करपायचा, वरून कच्चा. मधला काढून खायचो. इतर पोरं टिंगल करायची. ती कॅन्टीन, स्वीट मार्टमधून खायला आणायची. पाटर्य़ा करायची. मला रोजच्या भाकरीची भ्रांत होती.
दहापकी दोन पोरं मदत करायची. शनिवार-रविवारी पार्टीला जायची, मग त्यांच्या जागी मला मेसला जेवायची संधी मिळायची. बाकी पोरं मजा पाहायची.. तेव्हा धडा शिकलो- तुमच्याकडं पैसा असेल तर हजारो लोक जवळ येतात, नसेल तर मजा पाहतात. लहानपणी प्रेरणा मिळावं असं वातावरण आजूबाजूला नव्हतं. पण नेहमीच मोठी स्वप्नं पाहायचो. हे कुठून आलं असेल? आता आठवतं, लहानपणी वडील, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्यानं ऐकायला न्यायचे. व्याख्यानांचे विषय असायचे- शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद. याच दोन महान व्यक्ती माझ्या प्रमुख प्रेरणास्रोत बनल्या.
माझं गाव सातारा जिल्ह्य़ातलं रहिमतपूर. वडील सातारच्या न्यायालयात क्लार्क. तोकडा पगार. ते सतत आजारी असायचे. आई-वडील, मी, धाकटा भाऊ भाडय़ाच्या खोलीत राहायचो. घरात लाइट नव्हती. चौथीत स्कॉलरशिप मिळाली. वर्गातल्या हुशार-श्रीमंत मुलांना मिळाली नव्हती, मला मिळाली. आत्मविश्वास वाढला. वडिलांनी शिक्षणासाठी पुण्यात आणलं. मुक्काम पोस्ट- फुगेवाडी. रामचंद्र फुगे चाळ. १० बाय १० ची खोली. वडिलांना जिल्हा परिषदेत नोकरी मिळाली. आजारपण सुरूच होतं. ते आजारी पडले की तीन-चार महिने बरे व्हायचे नाहीत. ससून, रुबी, बुधराणी, केईएम, िपपरीचं चव्हाण रुग्णालय फिरायचो. दरम्यान, आईला शिक्षिकेची नोकरी मिळाली. तरीपण पशाची चणचण असायचीच. पशाची गरज पडली की आई कानातला दागिना, मंगळसूत्र सोनाराकडं तारण ठेवून व्याजानं ५००-१००० रुपये घ्यायची.
माझं नूमवि, मॉडर्न हायस्कूलला शिक्षण झालं. मी वर्गात हुशार. गणितात तर पकीच्या पकी मार्क पडायचे. मॉडर्नमध्ये गणिताच्या रासकर सरांचा मी आवडता विद्यार्थी. ते कधीच पकीच्या पकी मार्क द्यायचे नाहीत, पण माझा एक मार्क कुठं कापायचा, हा त्यांना प्रश्न पडायचा. या गणितानंच मला उभं केलं. कारण आयुष्यात गणितच तुमच्या कामी येतं.
दहावीत चांगले मार्क मिळाले. आईच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी सुचवलं- डिप्लोमाला घाला. मग गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये गेलो. सायकलने जायचो. याच काळात वडील गेले. त्यांचं वय होतं- ४५ वष्रे नि माझं १८.
वडिलांना कपडय़ांची हौस होती. त्यांना थ्री-पीस सूट आवडायचा. त्यांनी जाण्यापूर्वी महिनाभर आधी सूट शिवायला टाकला होता. ते गेल्यावर मी तो घेऊन आलो. त्या प्रसंगानं सांगितलं- ‘माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही.’ काहीशी विरक्ती आली. त्याच वेळी ठरवलं, काहीतरी वेगळं, इतरांसाठी करायचं. ‘भारत विकास प्रतिष्ठान’ (बीव्हीजी) या नावाची संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून दानशूरांकडून देणग्या घेऊन गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणं सुरू केलं. शिक्षण सुरू असतानाच क्लास घेणं, सॉस-जॅमच्या बाटल्या विकणं, घरं रंगवून देणं अशी कामं घेणं सुरू केलं.
इंजिनीअर बनायचं होतं. त्यासाठी औरंगाबादला प्रवेश मिळत होता, पण आईच्या आग्रहाखातर पुण्यातच राहिलो. व्हीआयटीला प्रवेश मिळाला, पण फीसाठी आईने मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँकेतून १५ हजारांचं कर्ज काढलं. माझा रोजचा ४२ किलोमीटरचा सायकल प्रवास सुरू झाला. दरम्यानच्या काळात वडिलांच्या सेवेतील काही रक्कम मिळाली. इतर काही पसे जुळवून गुरव-िपपळे येथे प्लॉट घेतला. त्यावर घर बांधलं. पशाची गरज होती. कॉलेजला प्रॅक्टिकलपुरतं जायचो. बाकी कामाच्या मागे लागलो.
तेव्हा बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियमचं काम सुरू होतं. एका एजन्सीकडं सिव्हिलची कामं होती. त्यांच्याकडं गेलो. माझं शिक्षण सुरू होतं इलेक्ट्रिकल इंजिनीअिरगचं आणि हे काम होतं सिव्हिलचं- काँक्रीटचा रस्ता करण्याचं. तीन लाख रुपयांचं कंत्राट होतं. मलाही घर बांधण्याचा अनुभव होता. एजन्सीला सांगताना ‘नरोवा-कुंजरोवा’ केलं. ‘डिप्लोमा केलाय, इंजिनीअिरग करतोय’ असं सांगितलं. पण कुठल्या विषयाचा हे बोललोच नाही. काम मिळालं, ते सात दिवसांत पूर्ण करायचं होतं. खर्च जाऊन दीडेक लाख रुपये सुटणार होते. मजुरांची जुळवाजुळव केली. आपल्याला पसे मिळणार म्हणून मजुरांनाही जास्त मजुरी दिली. महिला-पुरुष अशा एका जोडीला दीडशे रुपये मिळायचे. मी अडीचशे रुपये दिले. शिवाय सकाळी चहा-वडापाव आणि रात्री त्यांना लागणारं त्यांचं आवडतं पेय. मजूर मंडळी खूश होती. शंभर जोडय़ा, पन्नास गाढवं मिळून पाच दिवसांतच काम उरकलं.
त्याचदरम्यान लातूरचा भूकंप झाला, पसे अडकले. मध्ये पाऊस झाला. त्यात आमचा रस्ता वाहून गेला. चूक समजली. लेव्हल केली नव्हती. डोक्याला हात लावला. रस्ता पुन्हा केल्याशिवाय पसे मिळणार नव्हते. रस्ता करण्यासाठी हाती पसे नव्हते. मजुरांना हे समजलं. ते मदतीला धावून आले. त्यांनी पसे न घेता काम केलं. सिमेंट, वाळूसुद्धा त्यांनीच मिळवली. रस्ता उत्तम झाला. पसे मिळाले. सर्वाचे पसे भागवून वर फायदाही झाला. आयुष्यात असे प्रसंग येत गेले, तेव्हा निराश न होता स्वत:च स्वत:ला प्रेरणा देत राहतो. विवेकानंदांचे ते शब्द उपयोगी पडले. आजही पडतात..
‘जेव्हा दशदिशा अंधकाराने भरून गेल्या होत्या,
तेव्हा मी म्हणत होतो- झुंजा, झुंजत पुढे चला..
आज आशेच्या प्रकाशानं दशदिशा किंचित उजळल्या असतील, तरीदेखील तोच मंत्र आहे- झुंजा, झुंजत पुढे चला!’
पुढं इंजिनीअिरगसाठी वसतिगृहात गेलो. एक सत्य समजलं, ‘जग नेहमीच प्रचंड अपमान करतं. ते मनाला लावून घ्यायचं नाही. तुम्ही हिरे असाल, तरी ते तुम्हालाच सिद्ध करावं लागतं..’ १९९४ साली बी.टेक.ची पदवी मिळाली. ‘टेल्को’मध्ये (आताची ‘टाटा मोटर्स’) ट्रेनी म्हणून नोकरी मिळाली. पगार- महिना सात हजार रुपये. टेल्को म्हणजे प्रतिष्ठेची नोकरी. तिथं नोकरी करत असतानाही घरं रंगवून देण्याची वगरे कामं सुरूच होती. कंपनीत भंगारमध्ये तांब्याच्या वापरलेल्या तारा होत्या. त्यांचा कंपनीसाठी उपयोग केला आणि कंपनीचे अडीच कोटी रुपये वाचवले. त्यामुळे माझ्यावरचा विश्वासही वाढला.
दरम्यान, माझ्या गावाकडून कामाच्या आशेनं मुलं माझ्याकडे येत होती. मी कर्मचारी असल्याने कंपनीतल्या कामाची कंत्राटं घेऊ शकत नव्हतो. कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच उपाय सुचवला- एखाद्या संस्थेतर्फे कामं घ्या. मग ‘भारत विकास प्रतिष्ठान’द्वारे हाऊसकीिपगचं काम घेतलं. ही गोष्ट १९९७ मधली. इंडिया गाडीचा प्रकल्प उभा राहत होता. तो स्वच्छ ठेवण्याचं काम घेतलं. आठ लोक होते. त्यानंतर मात्र मागं वळून पाहिलंच नाही. वाट्टेल ते काम द्या, नाही म्हणायचं नाही. हे आमचं तत्त्व. तेच कामी आलं.
गावचा मित्र उमेश माने हा माझ्यावर विश्वास टाकणारा पहिला माणूस. त्यांनी प्रतिष्ठानच्या कामासाठी नोकरी सोडली. कंत्राटं मिळवणं, पशाची जुळणी करणं हे माझं काम आणि काम करून घेणं ही उमेश माने यांची जबाबदारी. पहिल्या वर्षीची उलाढाल होती आठ लाख रुपये. पुढच्या वर्षी ती झाली ५६ लाख रुपये. गुणवत्ता, प्रामाणिकपणा, विश्वास आणि वेळेच्या आधी पूर्ण होणारं काम यामुळे आम्हाला काम देणारे लोकच आमची प्रसिद्धी करत होते. आपोआप कामं मिळत होती. १९९९ मध्ये लग्न झालं. पत्नी वैशालीने घरची जबाबदारी उचलली. मग नोकरी सोडून हे काम पूर्णवेळ करायला लागलो. पुढे जनरल इलेक्ट्रिकल्सच्या (जीई) प्लँटचं स्वच्छतेचं काम मिळालं. बंगळुरूला जावं लागणार होतं. विलंब न करता मी, उमेश आणि आठ कामगार तिथं धडकलो. आमचे प्रेरणास्रोत शिवाजी महाराज. त्यांनी दक्षिणेवर स्वारी केली होती. आम्हीसुद्धा त्यांच्याच मातीतले ना! कंपनीचं दोन दिवसांनी उद्घाटन होणार होतं. त्याआधी प्लँट चकाचक केला. कामाची गुणवत्ता पाहून लोक समाधानी होते. मग चेन्नई, हैदराबाद अशी इतर शहरांमधली कामं मिळाली. कामाला नाही म्हणत नव्हतोच. रेल्वे स्थानकं, विमानतळ, रुग्णालये यांच्या स्वच्छतेचं काम घेतलं.. विस्तार वाढत असताना कर्मचाऱ्यांबाबत एक सूत्र कायम ठेवलं. कामावर देखरेख करणारा सुपरवायझर गावातला, विश्वासाचा माणूस, ३० टक्के कर्मचारी पुण्याहून-गावाहून पाठवलेले आणि ७० टक्के स्थानिक कर्मचारी. त्यामुळे कुठंही कामात अडथळा आला नाही.. अजून सारं सुरळीत सुरू आहे.
आणि म्हणूनच असेल कदाचित, मी पाहिलेली स्वप्नं पूर्ण झालीच. कधी तीन दिवसांतच, तर कधी १०-१५ वर्षांनी. १९९७ मध्ये पहिलं कंत्राट मिळालं तेव्हाच स्वप्न पाहिलं- आपल्याला संसदेच्या हाऊसकीिपगचं काम मिळालं तर.? तेव्हा माहीतही नव्हतं, तिथं काय पद्धत असते. पण २००३ साली हे स्वप्न पूर्ण झालं. ‘बीव्हीजी’चं नाव वाढत होतं. ते आता दिल्लीपर्यंत पोहोचलं होतं. संसदेच्या ग्रंथालयाचं कंत्राट मिळालं. देखभालीचं काम. तिथं श्रीनिवासन नावाचा शिस्तबद्ध आणि प्रामाणिक मुख्य अभियंता होता. त्याला भेटून विश्वास दिल्यावर काम मिळालं, पण ते सहा महिन्यांपुरतंच. चांगलं केलं तर पुढं सुरू ठेवणार, नाहीतर हाकलून देणार. त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यासाठी ४० लाख रुपयांची दर्जेदार यंत्रणा विकत घ्यायला लागणार होती. काम सुरू राहिलं नाही तर ही यंत्रणा पांढरा हत्ती ठरणार होती. पण स्वत:वर विश्वास होताच. काम सुरू केलं. ते सुरूच राहिलं. श्रीनिवासन खूश झाले. त्यांनी पुढच्याच वर्षी लोकसभा, राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं दिली. पण सुरक्षेच्या कारणास्तव आत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ‘बीव्हीजी’चे कर्मचारी बाहेरचीच स्वच्छता पाहत होते. बाहेरचा परिसर इतका स्वच्छ पाहून खासदारांनीच याबाबत विचारणा केली. मग थेट लोकसभेच्या सभापतींनी परवानगी दिली, तेव्हा ‘बीव्हीजी’चा लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश झाला. पुढं पंतप्रधानांचं निवास. तिथं बागेत चालण्यासाठी लाल दगडांचा मार्ग होता. तो धूळ बसून काळा झाला होता. तो पहिल्यासारखा स्वच्छ लालभडक केला आणि त्याने किमया केल्यासारखं अनेकांचा विश्वास बसत गेला. मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय.. दिल्लीतील प्रत्येक महत्त्वाच्या वास्तूला ‘बीव्हीजी’ची सेवा मिळू लागली. आज एकटय़ा दिल्लीत ‘बीव्हीजी’चे नऊ हजार लोक काम करतात. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे ६० हजार. अगदी तिसरी उत्तीर्णपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत! विस्तार वेगाने वाढतोय. भारतीय रेल्वे, टाटा समूह, फोक्सवॅगन, िहदुस्थान लिव्हर, ओएनजीसी, आयटीसी.. कितीतरी ग्राहक आहेत. देशभर २० राज्यांमध्ये चारशेपेक्षा जास्त कंपन्या, संस्था, आस्थापना ग्राहक आहेत. कोणतंही मोठं नाव घ्या. आम्ही तिथं आहोतच. आता विविध क्षेत्रांमध्ये उतरलोय.
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सíव्हसेसच्या रुग्णवाहिकेचे (डायल १०८) कंत्राट ‘बीव्हीजी’कडं आहे. त्यासाठी सुविधांनी युक्त रुग्णवाहिका राज्यभर धावत आहेत. याशिवाय लँडस्केिपग-गार्डिनग, टेक्निकल सíव्हसेस, सुरक्षा सेवा, औद्योगिक सेवा, सोलार पार्क, एलईडी लायटिंग, सोलार पंप, प्लास्टिकपासून इंधन, फूड पार्क अशा अनेक क्षेत्रांत जम बसवतो आहे. ‘नॅशनल इन्नोव्हेशन फाउंडेशन’शी भागीदारी केली आहे. त्याद्वारे विविध व्याधींवरील चहा, आरोग्यदायी उत्पादने, शेळीचे दूध, उंटणीचे दूध, जैविक खते, जैविक कीटकनाशके अशा अनेक उत्पादनांमध्ये प्रवेश केला आहे.
मी इतके सारे उद्योग कसे करू शकतो? कारण माझ्या वाटचालीत विविध टप्प्यांवर भेटलेले असंख्य लोक आज माझ्यासोबत ‘बीव्हीजी’मध्ये आहेत. मी कार्यक्षम माणसं शोधतो आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकतो. बस्स.. हा संच वाढतो आहे, उत्तरोत्तर अधिकच वाढत जाईल. ‘बीव्हीजी’चं ब्रीदवाक्यच आहे- ‘ह्य़ुमॅनिटी अहेड!’
२०२० पर्यंतचे उद्दिष्ट आहे दोन लाख कर्मचारी आणि कंपनीची १० हजार कोटींची उलाढाल! हे सर्व करताना माझ्या कर्मचाऱ्यांचा, सामान्य माणसांचा विचार असतो. कर्मचाऱ्याला इतर कंपन्यांपेक्षा दोन पसे जास्तच मिळतात. त्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून इतर क्षेत्रांत प्रवेश करतोय. शासनाच्या विविध योजनांतून माझ्या ६०० कर्मचाऱ्यांसाठी स्वस्तात घरे देऊ शकलो. जे.आर.डी.टाटा हे उद्योगातील आदर्श आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकलो- सामाजिक बांधीलकी, कामाची पद्धत, एकजीनसीपणा. त्यामुळेच ‘बीव्हीजी’च्या मुख्यालयाला (चिंचवड, पुणे) नाव दिलंय- ‘बीव्हीजी हाऊस’! टाटांच्या ‘बॉम्बे हाऊस’चा हा प्रभाव!
लोकांचा विचार करत गेलो की आपोआप पसा मिळतो. मी हेच करत आलो. त्यामुळे मीसुद्धा मोठा झालो. कधी गैर काम करत नाही, कोणाचं वाईट चिंतत नाही, कोणाला फॉलो करत नाही, कोणाशी स्पर्धा करत नाही, संधी मिळाली तरी अनसíगक नफ्याच्या मागे लागत नाही. त्यामुळे कधीही डोळे मिटले तरी शांत झोप लागते.
सर्व थरांत लहानमोठय़ा लोकांमध्ये वावरतो. राजकीय व्यक्ती, आध्यात्मिक गुरू, प्रशासकीय अधिकारी सर्वाशी मत्री आहे. त्यामुळे अनेकांचे गरसमज होतात, पण कोण काय म्हणतं याकडं लक्ष न देता पुढं जात राहतो. त्याच वेळी कामगाराशी खांद्यावर हात टाकून बोलतो. त्यात काही वेगळं- विशेष वाटत नाही. आता इतकी पत कमावली आहे की, शेकडो कोटींचं कर्ज द्यायला बँका तयार आहेत. पण पूर्वी आईसाठी फ्रीज, वॉिशग मशीन घ्यायला कोणी कर्ज देत नव्हतं, ही परिस्थितीही विसरलेलो नाही. म्हणून जमिनीवरूनच चालतो..
खरंतर आता थांबलो तरी वैयक्तिक काही बिघडणार नाही. पण लोकांना जोडणं हे माझं व्यसन आहे. शिवाय आजच्या जगातही सरळ मार्गाने मोठं होता येतं, इतरांनाही मोठं करता येतं, हे दाखवून द्यायचंय. त्यासाठी मला कार्यरत राहावंच लागेल. कारण माझा आजही तोच मंत्र आहे- झुंजा, झुंजत पुढे चला!
हणमंतराव गायकवाड -hrg@bvgindia.com
(अध्यक्ष, बीव्हीजी इंडिया)
(शब्दांकन- अभिजित घोरपडे)
No comments:
Post a Comment