हंबीरराव टेंभे-पाटलांचे नातवाच्या शिक्षकास पत्र
मास्तर!
आजपासून आमचा नातू तुमच्या वर्गात बसणार हाय!
त्यो घरी बसला काय आन् तुमच्या वर्गात बसला काय, आमाला सारकंच!
पर त्यो घरी बसला तर तुमचा संसार कस्काय चालणार? म्हून त्याला तितं बसाया पाठूतो!
तर सर्वात पैली गोष्ट म्हंजी- काय बी कम्प्लेन आली नाई पायजेल. त्येचा मूड असंल तवा शिकवा न्हाय तर गूमान ऱ्हावा.
त्यानं हातात यील ती वस्तू फेकून मारली तं समजा का त्याचा मूड नाय!
शाळंच्या पुस्तकात आस्तं ते त्याला कुणीबी शिकवंल. जे पुस्तकात न्हाय, ते त्याला आलं पायजेल.
मान्सानं आयुष्यात जोडधंदा केला पाह्यजे, हे त्याला सांगा. म्हंजी येक फेल गेलं तं दुसरं कामाला येतं. साकर कारखाना तोटय़ात गेला तं हाताशी ब्यॅंक, पतपेढी पाह्यजे.
तुमी कसं, शाळेत शिकवता, शिकवण्या घेता, यलायसीच्या पॉलिशा इकता आन् घरी म्हशीबी बाळगता, तसं!
त्येला पैशाचं म्हत्व सांगा. पैसा गाठीशी बांधताना माणूस रंगांधळा झाला पाह्यजेल. म्हंजी काळा काय आन् पांढरा काय, दोनी सारकंच! पैशा-पैशामधी भेदभाव नको.
त्यो करायचाच आसंल तं माणसांमधी करावा. माणूस कवा उलटंल सांगता येत न्हाय. पैसा मातूर आपल्या धन्याशी कदी बेईमानी करत न्हाय!
त्येला सांगा, शिक्शान घेण्यापेक्षा शिक्शान देणं हे मोठं हाय. शिक्शान घेऊन फक्त घेणारा शाना होतो. देल्यानं समाज शाना हुतो.
समाजानं किती शानं व्हावं, हे आपण ठरवायचं आसंल तं आपण शिक्शान देणारे झालो पायजेल.
त्येला परीक्षेचं तंत्र समजाऊन सांगा. कोणत्या सेंटरवर परीक्षा देल्ली तं बिनभोबाट नक्कल करता यील, त्येची म्हाईती कशी काढाची, पेपर तपासायला कुणाकडं गेले, तपासणाऱ्याचा रेट काय, रेट नसंल तं त्याचे नट-बोल्ट कसे कसाचे, हे समदं जनरल नालेज कुठनं मिळवायचं, ह्येचे त्येला धडे द्या.
त्येला सांगा- जगात दोन टाईपची माणसं अस्त्यात. जगातली मोठी मोठी बूकं वाचून हुषार होणारे आन् अशा हुषार माणसांना आपल्या पदरी ठिवणारे.
माणसानं हुषार होण्यापेक्षा हुषारांना पदरी ठिवणारं व्हावं!
त्येला ह्या देशाइषयी सांगा. त्येला सांगा- हा देश म्हान हाय, पर तू त्येचा फार इचार करू नगंस. तू इचार केल्यानं काय देश आणखी म्हान होणार न्हाय. देशाला म्हान म्हणणं ही बी एक फॅशन आसती; तवा त्यात फार येळ घालवू नगंस!
त्येला शिकवा, का जगण्याची रीत काय आसती.. लोकशाही काय आसती. जास्तीत जास्त लोक ज्येच्या बाजूनं उभं ऱ्हातात ती गोष्ट चांगली, आसं लोकशाही सांगते.
पण या लोकांना जुलमानं, जबरीनं उभं केलं, का ते सोताच उभे राह्यले, ह्ये तपासण्याच्या फंदात लोकशाही पडत न्हाय. तिनं पडू बी न्हाय!
रस्त्यात सापडलेल्या रुपयापेक्षा म्हेणतीनं कमावलेलं धा पैसं मोठं आसत्यात, आसलं काही त्याला शिकवू नगंसा. धा पैसं कमावलं आन् रुपया सापडला तं आपली टोटल वाढते, ह्ये त्येच्या लक्षात आणून द्या.
रस्त्यात रुपया सापडला ह्येचा आर्थ त्यो निट बगून चालतो. त्येचं त्येला हे फळं मिळालं, आसं समजाचं!
माझा नातू हितभर हाय आन् तुमाला मी हातभर गोस्टी सांगतूय, आसं तुमाला वाटंल; पर माणूस हितभर आसल्यापासूनच त्येच्या कानावर हिताच्या गोष्टी पडल्या पायजेल. तो हातभर झाला की हाताभाईर जातो. तवा हे समदं ध्यानात ठिवा.
माजा नातू तसा हुषार हाये. त्यो तुमच्यावर लक्ष ठिवणार हायेच. तुमीबी त्येच्यावर लक्ष ठिवा. आता या!
तुमचा-
हंबीरराव टेंभे-पाटील