Tuesday, 7 April 2015

Every thing for self

आवडलेली कविता

"सारंकाही स्वतःसाठी"

देवधर्म पूजाअर्चा
सारं असतं स्वतःसाठी
देवाला यातलं काही
नको असतं स्वतःसाठी

फूलं अर्पण करतो देवाला
ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून?
सारी पृथ्वीच ज्याचा बगिचा
त्याला काय करायचंय फुलं घेऊन?

नैवेद्य जो आपण दाखवतो
तो काय देव खातो?
तो तर स्वतःच प्राणीमात्रांचं
भरणपोषण करित असतो

निरांजनाच्या इवल्या ज्योतीने
ओवाळतो आपण प्रभूला
चंद्रसूर्य जातीने
हजर ज्याच्या दिमतीला

स्तोत्रं त्याची गातो ती काय
हपापलाय म्हणून स्तूतीला?
निर्गुण निराकार जो
त्याला अवडंबर हवंय कशाला?

सारं काही जे करायचं
ते स्वतःसाठीच असतं करायचं
प्रार्थनेनं देव बदलत नसतो
स्वतःच स्वतःला असतं सुधारायचं
आवडलेल्या आमटीचा
आवाज करीत मारता भुरका
विश्वास ठेवा यात काही पाप नाही
......आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही

जबरदस्त डुलकी येते
धर्मग्रंथ वाचता वाचता
लहान बाळासारखे तुम्ही
खुर्चीतच पेंगू लागता
विश्वास ठेवा यात काही पाप नाही
..आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही

देवळापुढील रांग टाळून
तुम्ही वेगळी वाट धरता
गरम कांदाभजी खाऊन
पोटोबाची पूजा करता
विश्वास ठेवा यात काही पाप नाही
..आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही

प्रेमाची हाक येते
तुम्ही धुंद साद देता
कवितेच्या ओळी ऐकून
मनापासून दाद देता
विश्वास ठेवा यात काही पाप नाही
..आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही

-- मंगेश पाडगावकर--

No comments:

Post a Comment