Saturday 18 April 2015

A poem from शिवाजी महाराज

शिवराय बोलले आज

।। शिवराय बोलले आज ।।

वेळ आहे का थोडा
चार शब्द सांगायचेत
राहवत नाही म्हणून
काही जबाब मागायचेत

आधी आभार मानतो
मोठं केलत मला
पण खरंच सांगतो तुम्ही
खोटं केलत मला

अवघ्या तुमच्या जीवनात
व्यापून टाकलत मला
मनात सोडून सगळीकडे
छापून टाकलत मला

नाव माझं घेतलत
सण माझे केलेत
माझे छावे म्हणून
राडे सुद्धा केलेत

एवढ्यावर थांबला नाहीत
मला देवासोबत बसवलत
वाईट वाटतंय म्हणताना
पण तुम्ही मला फसवलत

माझे विचार घेतले नाहीत
माझे आचार घेतले नाहीत
चरित्र माझं ओरबाडलत
पण त्याचे सार घेतले नाहीत

नुसते प्रताप आठवू नका रे
तत्व सुद्धा जपा
स्मारक पुतळे झगमग नको
माझे किल्ले जपा

निष्ठा धैर्य न्याय नीती
तत्व माझी कुठे गेली?
अरे तुम्ही सगळे माझेच ना
मग तुमची एकी कुठे गेली?

काय नक्की साधायचंय
कशात भूषण आहे
हा विचार केला नाहीत
तर सगळंच कठीण आहे

स्वाभिमानात सामर्थ्य आहे
त्याच्या जागी माज नको
आणि आहे जिथे स्वाभिमान
तिथे मुळीच लाज नको

असो; याहून काय सांगू
तुमचा काळ वेगळा आहे
पण असे नका वागू ज्याने
मला वाटेल मी एकटा आहे..

No comments:

Post a Comment