Wednesday, 18 March 2015

SsShhh it's sleeping

माझी सावली माझे काव्य.
“ मस्त झोपलाय देश, झोप त्याची मोडू नका “
गोळीबार बॉम्ब इथे फोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll
भ्रष्टाचार पसरतोय.. पसरु दे
रुपया घसरतोय.. घसरु दे
अंगावरचे पांघरुण उगाचच ओढू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll
लुटालूट, बलात्कार.. बघूच नका
रांगेमध्ये उभे रहा.. बोलूच नका
नेत्यांचेच पाय धरा बोल त्यांचे खोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll
त्यांचे सारेच चांगले.. बोलत रहा
आपले मत पैशाने.. तोलत रहा
कमरेवरचे सांभाळा ते मात्र सोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll
खायला नसले चालेल.. पुतळे बांधा
नाड्या हरवल्या तर.. सूतळे बांधा
असे हवे तसे नको उगाच चर्चा झोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll
तेच लिहिणार भाग्य.. वाईट काय
पीत रहा दिवस आणि.. नाईट काय
सारेच धुंदीत आहेत ग्लास त्यांचे फोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll
गांधी रस्ता खड्ड्यात.. चालूच नका
देशसेवा बाता आता.. बोलूच नका
मरणाचीच वाट पहा उगाच राष्ट्र जोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll...
ही कविता कोणी लिहिली माहित नाही ....पण ज्याने
कोणी लिहिली असेल त्याला सलाम ...!

No comments:

Post a Comment