पूर्वी कोकणातून
जाणारी पत्रे अशी असत ..!
चिरंजीव बालके तात्यास अनेक आशीर्वाद, पत्रास कारण कि लखू बापटा बरोबर तू पाठवलेला चहापुडीचा खोका आणि नातवाच्या वाढदिवसाचे फोटो मिळाले, मधु फोटोत एवढा बारीक का दिसतोय? येत्या चैत्रात त्याला आठव वरील लागेल पण अंगाने अजून भरला नाहीये, या वर्षी त्याची मुंज इथे गावी करावी अस तुझ्या आईच्या मनात आहे, त्याला परीक्षा झाली कि पाठवून देणे, दोन महिन्यात गुरगुट्या भात आणि आंबे खायला घालून त्याला खोंडा सारखा तयार करतो. गुरगुट्या मेतकुट भातासारख जगात दुसर टोनिक नाही. तुम्ही देखील ते खाऊनच दगडा सारखे ठणठणीत झालात.
आम्ही सर्व म्हणजे मी आणि तुझी आई क्षेम आम्हाला काय धाड भरल्ये म्हणा, पण तुझ्या आयशीस मधून मधून खोकल्याची उबळ येते मग रात्रभर विटकराने छाती शेकत बसते. आयशीला जिवंत ठेवायची असेल तर तिला चांगला डॉक्टर वैद्य करणे आवश्यक आहे. त्या मुंबईत राहून ज्या दोनचारशे रुपड्या मिळवता पण त्याचा आम्हास काही उपयोग नाही .आपली शेती, बाग, गुर हे सर्व असताना आपणास का भिकेचे डोहाळे लागले आहेत हे तो परमेश्वर जाणे.इतके दिवस चार गडी, बाया बोलवून मी हा गाडा रेटला तसा मी तुमच्यावर अवलंबून नाही पण आता दगदग सहन होत नाही. यावर्षी १५० कलम उत्तम लागले आहे पण खाजणातील कलमांला एकही फळ नाही, पुढील वर्षी फवारणी करावी लागेल असो आंबे उतरवायला हल्ली गडी मिळत नाहीत. पुढील पडवीचे दहा रेजे बदलायला झाले आहेत तसेच ओटीवरील एक भाल हि पावसाळ्याच्या आधी बदलायला हवे आहे, टेंगळया सुताराला चार निरोप धाडले आहेत. वरच्या विहिरीचे पाणी आटले आहे. सध्या सगळा व्यवहार खालच्या बागेतील विहिर्रीवर. लक्षा बैल हि खूप थकला आहे, बागेस व्यवस्थित शिंपण होत नाही. रहाटाची माळहि चार कासरे वाढवून घेतली. परवाच बांधावरच्या ५ माडांचा ३०० नारळ उतरवून चीपळूणास पाठवला, तुळशीच्या अंगणातील कोकम्बीची फळ काढायची आहेत, तिथला बंधाराही थोडा डाकलग झालाय, चिरे आले कि लिंपून घेतो. कालच मांडव घालून घेतला. एकदा आंबा उतरवायला सुरवात झाली कि मला उसंत मिळणार नाही. सुपारीची शिंपट गोळा करायची, सोडे काढायचे, मांडवावर वाळत टाकणे, फणस फोडून त्याची साठ घालणे, आठीळा धुवून चिखलात बुडवून वाळत घालणे, केरसुणी बांधणे,रोज झापावर आमसूल वाळत घालणे, खालच्या दोन्ही चोन्ड्यात भाजावण इत्यादी साठी गडी बाया सांगितल्या आहेत. उद्या पासून देवळात रामनवमीचा उत्सव सुरु होईल.
या वर्षी उत्सवाला साष्टांग नमस्कार नाटक करायचं घाटत आहे. अनेक वर्षापूर्वी झाल होत त्यात तुझ्या आयशीने झकास शोभनाची भूमिका केली होती, झकास दिसायची हो त्या काळी तुझी आई, पण या इथल्या रामरगाड्यात सापडली त्यात सहा बाळंतपण, एकेकाळी बालगंधर्वाच्या रुख्मिणी सारखी दिसणारी अगदीच कशिया त्यजू पदाला वाली सिंधू झाली.
पुढील आठवड्यात चिपळूण कोर्टात तारीख आहे यावेळी तुझ्या काकाला माझा सोमण वकील आसमान दाखवणार नक्की एकच इच्छा आहे हि भावबंदकी आमच्या पिढी बरोबरच संपावी. परवा माधवचे टपाल आले होते आम्हाला तिकडे या म्हणून लिहिलंय, विमानाच्या तिकिटाचे पैसे पाठवू का विचारीत होता? त्याला निरोप धाडलाय, कितीही पैसेवाला झालास तरी उताराला पैसे घेण्याएवढा तुझा बाप नादार झालेला नाही. असो, पत्रात शेवटी त्याच्या मुलीने दोन झकास ओळी लिहिल्या आहेत, अक्षर छान आहे हो पोरीच. बोटावर उभ्या पट्या खाऊन देखील तुझे आणि माधवाचे अक्षर सुधारले नाही पण माझ्या सुंदर अक्षराचा गुण तुमच्या मुलांमध्ये म्हणजे आजोबांचा गुण नातवंडात उतरला. ती लिहिते अज्जूडला नमस्कार आणि ग्रांडपा तुमची खूप आठवण येते, ते पत्र आल्यापासून तुमची म्हातारी देखील मला ग्रांडपा म्हणते. एकदा जायला हवे हो या चिमण्यांना पाहायला. एकदा ठरव रे, तू तुझ कुटुंब आणि आम्ही अटकेपार झेंडे लावूया. अरे आता तरी अबोला सोडा, बस झाली भांडण. हो परवा वरच्या आळीतील दादा खरे उलथला खरे ते आपल्या दसक्यातले पण त्यांनीच पिढी तोडली आहे त्यामुळं पत्र मिळाल कि फक्त अंघोळ करावी.
एकदिवस आम्हालाही न्यायला वैकुंठातून विमान येईल, असो.
तुझ कस चालल आहे, अरे तुझ्या आयशीला रहावेना म्हणून पत्र लिहिले. मुलांच्या परीक्षा झाल्या कि ताबडतोब सूनबाई आणि मुलांना पाठवणे, येताना २ किलो लाल छत्री चहाचे खोके पाठव. आई रोज मागच्या मांडवावर कावळा ओरडला कि तुझ पत्र येईल म्हणून वेड्यासारखी वाट पहात बसते ,परवा तर दारात भांडहि उपड ठेऊन झाल.
आमचे हे नेहमीचेच आहे, तब्येतीची काळजी घ्या. जास्त दगदग होत असेल तर साहेबाच्या तोंडावर राजीनामा फेकून घरी ये इथे आता तालुक्याला उत्तम शाळा आहेत.
सुनबाईच्या आई बाबांना विचारलाय म्हणून सांग.तिच्या भावाला देखील बोलावलंय म्हणून सांग.अरे आम्हालाही आमची पिल्ल मधून मधून बघावीशी वाटतात ,तुम्ही महिनाभर येऊन घराच गोकुळ करून गेलात कि उर्वरित १०/११ महिने भिंती भूता सारख्या अंगावर येत नाहीत .बाळानो तुमच येण हेच आमच्यासाठी वर्षभराच टोनिक असत.
असो. काळजी करू नये.
सर्वाना आशीर्वाद .
तुझा अप्पा .
[मंडळी साधारण ३५/४० वर्षापूर्वी कोकणातून अशी पत्र पुण्या, मुंबईत येत असत]
No comments:
Post a Comment