शिक्षण आनंदमयी होण्यासाठी...-
-शनिवार, 21 फेब्रुवारी 2015
सुषमा पाध्ये
मुलांना शिकविताना शिक्षकही शिकत असतो. मुलांना शिकते करण्याच्या संधी शोधाव्या लागतात, निर्माण कराव्या लागतात. त्यासाठी नव्या पद्धती, उपक्रम, साधने तयार करावी लागतात. ही सारी प्रक्रिया अभ्यासपूर्ण व आनंदमयी व्हायला हवी. - सुषमा पाध्ये (शिक्षणाच्या अभ्यासक)महाराष्ट्राचा प्राथमिक शिक्षणाचा दर्जा अजून एक पायरी खाली उतरल्याच्या निष्कर्षात धक्कादायक, अनपेक्षित असे काही नसले तरी ते दुखःदायक आहे. शहरांत, गावांत, खेड्यांत, पाड्यांत शिक्षणकेंद्रांची वाढ झाली. रानावनातील मुले शाळेत आली, तरी मुलांचे शिकणे मात्र राहूनच गेले. यामागे शिक्षक, पालक, समाज, सरकारी यंत्रणा अशा प्रत्येक घटकाबाबतची कारणे सर्वपरिचित आहेत. प्रामुख्याने शिक्षकांवर असलेल्या अनेक अशैक्षणिक जबाबदाऱ्यांची कारणे दूर व्हायला हवीतच. ज्या योगे शिक्षक पूर्णपणे शिकविण्यावर, विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करू शकेल. शाळेत शिक्षण होण्यासाठी कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत, हे शोधताना लक्षात येते, ‘शिक्षक मानसिकता’, त्यांची अंत:प्रेरणा ही सर्वांत आवश्यक बाब आहे. शिकणे आणि शिकवणे या दोन्ही अंतर्गत प्रेरणा आहेत. अंतःप्रेरणेने काम करण्यात ‘आनंद’ असतो, म्हणूनच त्यात कष्ट, अडचणी वाटत नाहीत. या प्रेरणेतून पुढील वाटा दिसू लागतात. मुलांना शिकविताना शिक्षकही शिकत असतो. ‘शिकवताना शिकणे’, त्यातून समृद्ध होणे हे शिक्षकाला समजले, तर त्याला ‘शिकविण्यातला आनंद’ मिळतो. मुलांच्या शिकण्याची हरप्रकारे तयारी करताना शिक्षकाचे स्वत:च शिकणे, कल्पकता व शोध यांचा सुरेख संगम होत असतो. मुले कशी शिकताहेत हे पाहणे, त्यांच्या कोणत्या प्रतिक्रिया येतात हे समजून घेणे, त्यांच्या प्रतिक्रियांना प्रतिसाद देणे, मुलांच्या कोणत्या चुका कशा होतात त्या ठिकाणी नेमकी कोणती व कशी मदत केली म्हणजे त्याला पुढे जाता येईल, यासाठी पर्याय शोधणे यातील आनंद शिक्षकाला पुरेपूर अनुभवता आला पाहिजे. मुलांना शिकते करण्याच्या संधी शोधाव्या लागतात, निर्माण कराव्या लागतात, नव्या पद्धती, उपक्रम साधने तयार करावी लागतात. ही सारी प्रक्रियाच अभ्यासपूर्ण व आनंददायी आहे. सकाळी उत्साहाने किलबिलत शाळेत प्रवेश करणाऱ्या मुलांचे चेहरे दिवसभर तितकेच किंबहुना अधिकच उमलत ठेवण्याची किमया शिक्षकाला साधायला हवी. अशा शिक्षकाचे मुलांच्या मनात अढळ स्थान असते.आजच्या शिक्षकाला सभोवताली शिकण्याच्या संधी पसरलेले उत्साही वातावरण मिळाले होते काय? स्वातंत्र्य, स्वच्छता, सौंदर्य, शोध, आव्हाने, कल्पकता या साऱ्यांचा अभाव असलेल्या नीरस शैक्षणिक वातावरणात शिक्षकाचे बालपण गेलेले असेल आणि डीएड, बीएडसारख्या प्रशिक्षणाच्या ठिकाणीही या प्रकारचे वातावरण मिळाले नसेल, तर त्या शिक्षकाकडून असे वातावरण निर्माण करण्याची अपेक्षा धरता येईल काय? खरेतर नव्या जगातील नव्या आव्हानांसाठी नवा आशय व नवी व्यवस्था तयार करायला हवी. शालेय रचना, भौतिक सुविधा, व्यवस्था, शालेय विषय, आशय, शिक्षक प्रशिक्षण यात संपूर्ण क्रांतिकारी बदल होणे गरजेचे आहे. या क्रांतीमधील एक बदल म्हणजे ‘शिक्षक’ होण्याचा निकष. आजच्या प्रशिक्षणव्यवस्थेत शिक्षण घेऊन आलेल्या शिक्षकांकडून शिक्षणप्रक्रिया आनंददायी होत नाही, मुले शिकू शकत नाहीत असा आपला अनुभव असेल, तर शिक्षकपणाच्या निकषाची चौकट ढिली करावी लागेल. केवळ ‘पीआर’ प्रशिक्षणाला महत्त्व न देता ‘ज्याला विषयज्ञान आहे ,ज्याला शिकविण्यात आनंद वाटतो, ज्याला शिकविता येते, ज्याला मुलांशी संवाद साधता येतो, ज्याची प्रयोगाची, संशोधनाची तयारी आहे,’ अशा निकषाच्या आधारे शिक्षक होण्याची संधी दिली पाहिजे. असा वेगळा विचार करणाऱ्या अनेकांनी स्वतःच्या आणि मुलांच्या आयुष्यात आनंदाची कारंजी फुलविली, हा जागतिक इतिहास आहे. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे प्रयोग त्यातून उभे राहिले आहेत. या प्रयोगांचे महत्त्व व वेगळेपण आपण मान्य केले पाहिजे. आजही पदवीधर इंजिनिअर, डॉक्टर, आर्किटेक्ट, सीए झालेले अनेक तरुण खऱ्या अर्थपूर्ण व आनंदमयी शिक्षणाचा शोध घेत मुलांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे अनुभवाला येते. स्वतःचे करिअर सोडून त्यांनी शिक्षणातील बदलांसाठी उडी घेतली आहे. त्यांच्याजवळ शिक्षकपणाची डिग्री नाही. मुलांना शिकते करण्याची अंतर्गत प्रेरणा हीच त्यांची डिग्री आहे. अशा तरुणांना शिकूनही त्यांचे शिक्षण निरर्थक वाटते, हा त्यांच्या आयुष्यातील किती वर्षांचा, पैशांचा आणि समाजाचाही केवढा मोठा अपव्यय आहे; परंतु त्यांचे ज्ञान ते शिक्षणात नवे काही करून बघण्यासाठी वापरत आहेत हे महत्त्वाचे. प्रशिक्षित शिक्षकांना लाजवेल अशी त्यांची तयारी आणि तळमळ दिसते. मुलांच्या शिकण्याच्या शैली शोधत ते मुलांसाठी विविध पद्धती तयार करत असतात. मुलांना हवे ते; पण योग्य तेच शिकता येण्याच्या संधी तयार करणे, शिकण्यासारख्या अनेक गोष्टी मुलांपर्यंत आणणे, खऱ्याखुऱ्या रचनावादी शिक्षणपद्धती अमलात आणणे, सहजतेने मूल्य रुजत जातील असे वातावरण मुलांभोवती निर्माण करणे यासाठी ही तरुण मंडळी असंख्य प्रयोग करत असतात. प्रसंगी छोट्या अनौपचारिक शिक्षण केंद्रात, जंगलात, आदिवासी भागात जाऊन तळमळीने काम करतात. अत्यल्प भौतिक सुविधा व मानधनात ते शिकण्या-शिकविण्याचा आनंद निर्माण करतात. आजवरच्या त्यांच्या शिक्षणात जे शिक्षण त्यांना सापडले नाही ते त्यांना त्यांच्या प्रयोगात सापडते. शिक्षक होण्याची अंत:प्रेरणा असेल, तर ‘प्रशिक्षित’ अशा नुसत्या कागदाची गरज उरणार नाही.समाजात विविध विचारांची, भावनांची माणसे घडायची असतील, विविध कल्पना निर्माण व्हायच्या असतील, असंख्य शोध लागायचे असतील, तर हरतऱ्हेच्या ज्ञानाचा मनुष्य शिक्षण क्षेत्राने सामावून घ्यायला हवा. शिक्षणात सातत्याने नवा विचार नव्या कल्पना राबवून बघणारे, नवे प्रयोग व संशोधन करणारे गट तयार झाले, तर शिक्षण प्रवाही राहील, शिक्षणाची व्याप्ती आणि सखोलता वाढेल.
No comments:
Post a Comment