Sunday 1 February 2015

Contribute to the teachers

विसरलो नाही मी
तळव्यावरची  जांभळी खूण
फोकाचा तो जाड व्यास
गणित म्हणजे काय अजून?

इतिहासाच्या सनावळी
एकाखाली एक शंभर ओळी
खाडाखोड केलीत तर
जाळ काढेन कानाखाली

शुद्धलेखन अलंकार
निबंधाचा साँल्लिड त्रास
वहीवरती लाल भोपळे
ओणवे रहा एक तास

आम्ल आणि अल्कली
सारी अक्कल बुडाली
शिवाय होती ठरलेली
शिव्यांची लाखोली

पाढे जर चुकलात तर
पायाखाली तुडवीन
कोंबडीचे पाय काढलेत तर
वहाणेने बडवीन

शीत वारे उष्ण वारे
इकडून तिकडे वाहून गेले
आमचे सारे बालपण
त्यांच्या संगे उडून गेले

गुरुजींच्या भितीमुळे
आपसूक शिकत गेलो
फटके खाल्ले थोडेफार
कणखर मात्र बनत गेलो

आयुष्यातले स्थैर्य
पाच आकडी पगार
कुणामुळे मिळाला
हा सुखी संसार?

ब्रॅडेड शूज घेताना
तुटकी वहाण आठवते
कुणास ठाऊक कशासाठी
पापणी थोड़ी ओलावते!

No comments:

Post a Comment